water shortage pudhari photo
धाराशिव

Tuljapur Water Shortage : तुळजापूर तालुक्यावर टंचाईचे सावट

तलावांतील पाण्याचा अनिर्बंध वापर सुरूच

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना तुळजापूर तालुक्यात मात्र पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासनाची ठोस पावले दिसत नाहीत. उपलब्ध जलसाठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन अद्याप झाले नसल्याचे चित्र आहे. तलावांतील पाण्याचा वापर सुरूच असून, बांधकामांसह अन्य कामांसाठीही पाणी वापरले जात आहे. वेळीच निर्बंध न घातल्यास पुढील तीन महिन्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि अनावश्यक वापरावर नियंत्रण आवश्यक आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यात या दृष्टीने ठोस कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

आज उपलब्ध असलेले पाणी उद्याच्या गरजांसाठी कसे टिकवायचे, हा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे भविष्यातील पाणीटंचाईची चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे बांधकामांसह अन्य कामांसाठी पाण्याचा वापर सुरू आहे.

तलावांतील पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबतही ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे उपलब्ध जलसाठा कमी होत गेल्यास उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू शकते.

निर्णय कधी होणार?

तालुका प्रशासन, महसूल विभाग आणि जलसंपदा विभागाने तातडीने जलसाठ्यांचा आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करावे, अन्य वापरावर आवश्यक निर्बंध घालावेत आणि टंचाई निवारणाचे नियोजन जाहीर करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या वापराबाबत योग्य आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांना काटकसरीचे आवाहन करण्याबरोबरच प्रशासनाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, हा कळीचा प्रश्न आहे. संभाव्य संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT