तुळजापूर बसस्थानकाच्या कंट्रोल रूममध्ये पावसापासून बचावासाठी छत्री घेऊन काम करताना नियंत्रक. 
धाराशिव

Tuljapur bus stand rainwater leakage |आठ कोटींच्या बसस्थानकात कंट्रोलरला छत्री घेऊन कामाची वेळ !

पावसाच्या पाण्यामुळे तुळजापूर बसस्थानकातील गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर शहरातील नव्या बसस्थानकाच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे आठ कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या बसस्थानकाच्या कंट्रोल रूममध्ये पावसाचे पाणी येत असल्याने ड्युटीवरील नियंत्रकाला चक्क एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात पेन घेऊन कामकाज करावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

तुळजापूर बसस्थानकाचे सुमारे सहा महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र, पहिल्याच पावसात बसस्थानकाच्या नियोजनातील त्रुटी समोर आल्याने भाविक आणि तुळजापूरकरांकडून संताप व्यक्त होत आहे. बसस्थानकाची रचना मोठ्या प्रमाणात खुल्या स्वरूपाची असल्याने पावसाळ्यात प्रवाशांना पावसाचा, तर उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.

पावसापासून बचावासाठी प्रवाशांना पुरेशी सुविधा नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. कंट्रोल रूममध्येही पावसाचे पाणी येत असल्याने बसच्या वेळा सांगणे, वाहनांची नोंद करणे यासारखे नियमित काम करताना नियंत्रकाला छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे सुमारे आठ कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या बसस्थानकाच्या कामाच्या दर्जासह नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

बसस्थानकाची तातडीने पाहणी करून पावसाचे पाणी आत येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांतून होत आहे. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन बसस्थानकाचा नव्याने आराखडा तयार करून प्रवासी सुविधा व व्यावसायिक वापराचा योग्य समन्वय साधावा, अशीही मागणी होत आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT