तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सव काळात मातेचे मंदिर दिवस-रात्र खुले राहणार असून, मातेच्या दैनंदिन नित्योपचार पूजेच्या वेळांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत.
शारदीय नवरात्रौत्सवापूर्वी दोन दिवस‘ भवानी ज्योत’ आपापल्या गावाकडे घेऊन जाण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळते. त्यानिमित्ताने 20 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत मातेचे मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडून चरणतीर्थ आटोपून नित्य पूजेचे घाट सकाळी सहा वाजता दिली जाणार आहे. या काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मातेचे पंचामृत अभिषेक, 5 सिंहासन महापूजा तर सायंकाळी 7 ते 9 या दोन तासात पंचामृत अभिषेकासह 2 सिंहासन महापूजा पार पडणार आहेत.
शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये दिवसभरात सहा तास मुख्य मूर्तीला अभिषेक पार पडणार आहेत. उर्वरित 18 तासात मुख दर्शन, धर्म दर्शन, सुरू राहणार आहे.मातेच्या इतर धार्मिक पूजा प्रकारात सकाळ, संध्याकाळ देवीच्या भाळी मळवट भरणे, मातेला महावस्त्र-अलंकार चढविणे, नैवेद्य, धुपारती, अंगारा, मातेचा छबिना, प्रक्षाळपूजा, कोरडा अंगारा हे नित्य कार्यक्रम सुरू राहणार आहेत.
2 ऑक्टोंबरनंतर 7 व 8 ऑक्टोंबर दरम्यानही मध्यरात्री 1 वाजता मंदिर उघडण्यात येत असून मातेच्या सीमोल्लंघन कार्यक्रमाची तयारी,पलंग- पालखी मिरवणूक, मातेचे शिबिकारोहण, सीमोल्लंघन, मंचकी निद्रा आणि अश्विनी पौर्णिमेनिमित्ताने मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर विराजमान करणे, सोलापूर येथील मानाच्या काठ्यासह मंदिरात निघणारी मातेची छबिना मिरवणूक अशा धार्मिक सोहळ्यासाठी मातेचे मंदिर काही काळापुरते बंद करुन चोवीस तास खुले राहणार आहे.