Tuljabhavani Temple Development Plan
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा तुळजा भवानी मंदिर स्वतःच्या निधीमधून करीत असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये मंदिराचे प्राचीन बांधकाम बदलण्यात येऊ नये. त्याचे जतन व संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
चुकीचे प्रकार हाणून पाडू, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात महटले आहे, की विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये भवानी मातेच्या मंदिरातील अत्यंत पुरातन, पवित्र, स्थापत्यशास्त्र, धर्मशास्रानुसार असलेला श्री तुळजा भवानी मातेचा गाभारा जाणीवपर्वक अयोग्य हेतूने नूतनीकरण केला जात आहे. रचना पालटली जात आहे. मंदिराची वास्तू ही राज्यातील पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित आहे. ती कोणत्याही परिस्थितीमध्ये न बदलता मंदिराचा विस्तार आणि विकास करण्यात यावा अशी मागणी या महासंघाने केली आहे.
अत्यंत प्राचीन असणारा देवीचा गाभारा ज्याला शिवकालीन इतिहास आहे त्याचे जतन व संवर्धन होताना मूळ भागाला कोणताही धक्का लागू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. मंदिरात पूर्वीपासून ज्या प्रथा परंपरा चालू आहेत, त्या जतन केल्या जाव्यात तसेच कुलाचारासाठी आराखडा मध्ये जागा निश्चित कराव्यात, मंदिरातील प्रवेश हा मुख्य द्वारातूनच असावा अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघ व समविचारी संघटनेने तहसिलदार तथा मंदिर व्यवस्थापक यांना दिले आहे.
यावेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनिल घनवट, दशावतार मठाचे महंत मावजीनाथ बाबा, जनजागृती समितीचे राजन बणगे, महंत इच्छागिरी बाबा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, संजय सोनवणे, विनोद रसाळ, सर्वोत्तम जेवळीकर, अमोल कुतवळ, शाम पवार, बाळासाहेब शामराज, परिक्षीत साळुंखे, संजय मैंदंगे, श्रीराम अपसिंगकर, सुदर्शन वाघमारे, नागेश शास्त्री अंबुलगे, तानाजी कदम, महेश चोपदार आदी हिंदुप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर जीर्णोद्धार व नूतनीकरणच्या आड मंदिर संस्थानला जुन्या रूढीपरंपरा मोडीत काढून कुलधर्म कुलाचार कायमस्वरूपी बंद करीत आहे. तो त्यांचा डाव आम्ही तिन्ही पुजारी मिळून हाणून पाडू असा इशारा भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिला.