तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात श्रावण अमावस्येनिमित्त बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांसह कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मानाच्या बैलजोड्या कमानवेस येथील डुल्या मारुती मंदिरापासून वाजत-गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आल्या.
कमानवेस येथील डुल्या मारुती मंदिरात महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा व भोपे पाटील यांच्या मानाच्या बैलजोड्या आणण्यात आल्या. याठिकाणी बैलांना पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मानाच्या बैलजोड्या तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आल्या.
मंदिरात पारंपरिक प्रथेनुसार मानाच्या बैलजोड्यांना श्री तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन देवीचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर बैलांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा सणाची परंपरा जपण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत वाकोजीबुवा आणि महंत हमरोजीबुवा उपस्थित होते.