तुळजापूर : कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात शुक्रवारी (26 सप्टेंबर) पाचव्या माळेला ललितापंचमीनिमित्त मातेची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. या महापूजेच्या दर्शनासाठी शुक्रवारी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली.
दरम्यान, नवरात्रौत्सव सुरू झाल्यापासून परतीचा पाऊस पाठ सोडत नसल्याने भाविकांसह स्थानिक व्यापारीवर्ग धास्तावला आहे. पावसामुळे यात्रेचे नियोजन कोलमडले असून देवी दर्शनार्थ येणारा भाविक सध्या पाऊस डोक्यावर घेऊनच आसरा शोधत आहे. तुळजाई नगरीत कुठेही सुरक्षित निवारा नसल्याने आबालवृद्ध पावसाला वैतागल्याचे दिसत आहे.
रथअलंकार महापूजेचे महत्व
मातेच्या एकूण पाच विशेष अवतार महापूजांपैकी रथ अलंकार महापूजा एक?आहे. ज्यावेळी मातेचा दैत्यांसोबत युद्धाचा प्रसंग उभा राहिला, त्यावेळी भगवान सूर्यनारायण देवीच्या मदतीला धावून आले. त्यांनी स्वत:कडील रथ मातेला त्रिलोक भ्रमणासाठी दिला. या क्षणाची आठवण म्हणून श्री तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा बांधण्यात येते.
दोनवेळा अभिषेक
श्री तुळजा भवानी मातेला सकाळी पाच तर सायंकाळी दोन तास पंचामृत अभिषेक सुरू आहेत. या काळात ज्या भाविकांचे अभिषेक आहेत त्यांनाच मातेच्या गाभार्यात प्रवेश मिळतो. उर्वरित भाविकांना सिंह गाभार्यातून देवी दर्शन घ्यावे लागत आहे. सध्या मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी कुठलेही बंधन किंवा संख्येची मर्यादा नसल्याने दिवस-रात्र दर्शन सुरू आहे. स:शुल्क दर्शन व्यवस्थेचा लाभ केवळ मोठे देणगीदार किंवा श्रीमंतांकडून घेतला जात आहे.
भाविकांच्या गर्दीची अपेक्षा
यंदा पावसामुळे गेल्या चार दिवसात देवी दर्शनार्थ भाविकांची अपेक्षीत गर्दी नव्हती. आज पाचवी माळ (ललिता पंचमी) आणि देवीचा वार शुक्रवारमुळे उच्चांकी गर्दी होईल, असे वाटत असतानाच पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने 50 टक्के गर्दी कमी होती. आता शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टीमुळे विकेंडला राज्याच्या कानाकोपर्यांतून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे.