तुळजापूर : तुळजाभवानी देवीला रोख रक्कम सोने-चांदी आणि पूजा साहित्य अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे भक्तांकडून दान मिळते. शुक्रवारी नियमित मोजणी करताना एक कोटी रुपयांचे सोने तुळजाभवानी देवीच्या गुप्तदान पेटीमध्ये दिसून आले. अज्ञात भाविकाने हे दान केल्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यालयात करण्यात आली आहे. नियमित मोजणीसाठी शुक्रवार 28 मार्च रोजी तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीच्या मूळ गाभाऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्रं. 2 मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.
मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे. या बिस्किटांवर त्याचे वजन 100 ग्रॅम आणि शुद्धता 999.0 असे लिहिले आहे. मंदिर संस्थान कडून कर्तव्यावर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.