तुळजापूर : दुष्काळी परिस्थिती आणि टंचाईचे सावट असतानाही शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सप्तमीला तुळजापुरात भाविकांचा महापूर लोटला. सुमारे दोन लाख भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्याचा अंदाज असून, तब्बल २२ तास दर्शन सुरू होते. शनिवारी सायंकाळपासून वाढलेली गर्दी मध्यरात्रीनंतर अधिकच वाढल्याने मंदिर परिसरासह शहरातील राज्य महामार्गांवर वाहनांची मोठी कोंडी झाली. वाहनतळावर जागा मिळविण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागली.
तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार पूजा
चांदीच्या सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना तलवार प्रदान करणारी भवानी माता, तसेच शेजारी उभारलेली किल्ल्याची प्रतिकृती, यामुळे देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधले. देवीचे भोपे-पुजारी सचिन परमेश्वर, अतुल मलबा, शशिकांत परमेश्वर यांच्यासह सहकाऱ्यांनी ही मांडणी केली होती.सकाळी देवीचे अभिषेक व नित्योपचार पूजा पार पडली. नवरात्रानिमित्त मंदिराचा गाभारा आणि परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य खुलले होते. ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात दर्शनासाठी भाविकांची अखंडित गर्दी सुरू होती. दरम्यान, शनिवारी रात्री पार पडलेल्या देवीच्या छबिन्यातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जयघोष आणि जल्लोषात छबिना पार पडला.
शनिवारी सायंकाळपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गर्दीचा ओघ कायम राहिला. शहरात येणारे चारही प्रमुख मार्ग चारचाकी वाहनांनी भरून गेले होते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी धावपळ करावी लागली. गर्दीचे नियोजन करताना पोलिसांनी विविध मार्गांवर बंदोबस्त ठेवला. सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास गर्दीचा ओघ काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.
सप्तमीच्या दिवशी सकाळीही दर्शनासाठी मोठी गर्दी होती. भाविकांना लवकर दर्शन मिळावे आणि मंदिरातून बाहेर पडताना अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी मंदिर प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. धर्मदर्शनासाठी भाविकांना सुमारे चार तास प्रतीक्षा करावी लागल्याचा अंदाज आहे. अभिषेक मार्गानेही भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. गर्दीच्या काळात दर्शनरांगेचे व्यवस्थापन करणे प्रशासनासाठी आव्हान ठरले.
बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गाचा दिलासा
दर्शनानंतर बाहेर पडण्यासाठी यापूर्वी मातंगी मंदिराचा मार्ग प्रामुख्याने वापरला जात होता. मात्र, नव्याने विकसित करण्यात आलेला बाहेर पडण्याचा मार्ग सुरू झाल्याने भाविकांना दिलासा मिळाला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवरात्र महोत्सवापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण झाले. गर्दीच्या काळात या पर्यायी मार्गाचा उपयोग झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, शनिवारी रात्री तुळजाभवानी मातेची मोर वाहनातून छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, नगराध्यक्ष विनोद गंगणे, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार माया माने, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांच्यासह पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.