तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारपासून (दि. ११) प्रारंभ होत आहे. नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या यात्रेसाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांची गर्दी किती राहणार, याकडे व्यापारी वर्गासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील चार दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होत आहेत. शनिवारी सुमारे दीड लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेच्या सुरक्षिततेसाठी तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, ७४ पोलीस उपनिरीक्षक, २४ पोलीस निरीक्षक आणि ११०० पोलीस कर्मचारी, तसेच ९९० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. नळदुर्ग, लातूर, सोलापूर आणि धाराशिव रस्त्यांवर स्वतंत्र वाहनतळ उभारण्यात आले असून, तेथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांसाठी प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांना घाटशीळ रोड-बिडकर तलाव मार्गावरून मंदिराकडे प्रवेश दिला जात आहे. जिजाऊ महाद्वार आणि आदिबाई आदिशक्ती मंदिर परिसरातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणी, स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था
नगरपरिषदेच्या वतीने ठिकठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याच्या पानपोई उभारण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, अतिक्रमण रोखण्यासाठीही विशेष पथक कार्यरत आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह शहराचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दुपारी घटस्थापना विधी
रविवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी दाम्पत्याच्या यजमानपदाखाली तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना विधी होणार आहे. विधिवत घटमिरवणुकीनंतर घटस्थापना होऊन देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल.