Tuljabhavani Temple Garbhagriha Reconstruction
तुळजापूर : तुळजा भवानी मंदिर संस्थान व राज्य पुरातत्व खात्याच्या संगनमताने तुळजाभवानी मंदिराचा मुख्य गाभारा व शिखर पूर्णपणे पाडून नव्याने बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कृतीला तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने विरोध दर्शविला आहे.
मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी म्हटले आहे, की यासंदर्भात सुरूवातीपासूनच मंदिर संस्थानची भूमिका संशयास्पद आहे. येथील पुजारी बांधव, देवीभक्त याबाबत अनभिज्ञ आहेत. संस्थानच्या स्वनिधीतून ५८ कोटींची जीर्णोद्धाराची विकास कामे सुरू आहेत.
ही कामे सुरू असताना मुख्य गाभाऱ्यातील टाइल्स काढल्यानंतर गर्भगृहातील शिळांना तडे गेल्याचे दिसून आले. त्यानंतर राज्य पुरातत्व विभागाकडून याची पाहणी करण्यात आली. राज्य पुरातत्व विभागाने याबाबतचा संरचनात्मक परिक्षण इंजोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीकडून घेतला आहे. हा अहवाल सर्वांसमोर न ठेवता त्याबाबत चर्चा न करता गाभारा व शिखर काढून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याचे मंदिर संस्थानचे नियोजन आहे. या संदर्भात सुरूवातीपासूनच भोपे पुजारी मंडळाने आक्षेप नोंदविलेला आहे.
दरम्यान केंद्राचे माजी संचालक तथा रायगड प्राधिकरणाचे तज्ञ संचालक ए. के. सिन्हा तसेच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी मंदिराची पाहणी केली. केंद्रीय पुरातत्व विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सध्या आहे त्या स्थितीत मंदिरचा गाभारा व शिखराची डागडुजी करून आहे. त्या स्थितीत ठेवता येईल. मात्र, याबाबत मंदिर संस्थान समाधानी नसून, यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मंदिर संस्थांनची भूमिका आहे. या संदर्भात लवकरच एक उचस्तरीय बैठक मुंबई येथे होणार असून याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भोपे मंडळाकडून दिली आहे.
मंदिरे म्हणजे केवळ इमारती नसून लाखो भाविकांच्या भक्तीचे प्रतीक आहे . धर्माचे आणि देवत्वाचे मूर्त स्वरूप आहे. गाभारा म्हणजे देवाचे घर असून पवित्र स्थळ आहे. मंदिर.ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेले तुळजा भवानी मंदिरचा गर्भगृह व शिखराचे जतन व संवर्धन करूनच दुरूस्ती केली जावी अन्यथा भोपे पुजारी मंडळाला न्यायालयाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशारा भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानला पिंपळाचा पार देखील पूर्वीच्या स्थितीमध्ये बांधता आला नाही. हे लक्षात घेता तुळजाभवानी देवीचा गाभारा पुन्हा बांधण्याचा निर्णय लाखो भाविकांच्या श्रद्धांना तडा जाणारे नियोजन आहे, म्हणून गाभाऱ्याची दुरुस्ती करावी.- अमरराजे कदम, अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ