तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव File Photo
धाराशिव

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : नऊ दिवस होणारा तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सवाला परंपरागत पद्धतीने आजपासून (दि.२) सुरू होत आहे. विविध धार्मिक कार्यक्रम आणि लाखो भाविकांची देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी यामुळे तुळजापूरच्या नगरीमध्ये भाविकांचा महापूर ओसंडून वाहणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमा या काळात परंपरागत चालत आलेले सर्व धार्मिक विधी करण्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली असून संस्थांचे अध्यक्ष डॉ. सचिन ओबासे हे सपत्नीक या नवरात्र काळात यजमान असणार आहेत.

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे मुख्य शिखर व होमकुंडावरील शिखर आणि भवानी शंकर मंदिराचे शिखर हे तीन प्रमुख शिखराचे रंगकाम करण्यात आले. असून मंदिरामध्ये छबीना पाहण्यासाठी जे भाविक स्टेडियमवर बसतात ते स्टेडियमचे देखील रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसर आकर्षक बनला आहे. मंदिराच्या सर्व परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ महाद्वार, राजे शिवाजी महाद्वार हे प्रमुख महाद्वारवरदेखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव

देवीचे धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी घाटशिळरोड कार पार्किंग येथून भाविकांना सोडले जाणार आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता विधिवत घटस्थापना होईल आणि नवरात्राच्या धार्मिक विधीला सुरुवात होईल. पहाटे दही-दुधाचे अभिषेक संपन्न होतील. त्यानंतर नित्य पूजा होईल. दरम्यान देवीचे धर्मदर्शन सुरू राहील. रात्री दहा वाजता नवरात्र मधील पहिला छबिना काढण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान भाविकांची गर्दीवर जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी विशेष लक्ष राहणार आहे. स्थानिक तहसीलदार आणि मंदिर संस्थांचे अधिकारी सर्व ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी येणाऱ्या उत्सवादरम्यान २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

अनेक जिल्ह्यातील नवरात्र मंडळे घटस्थापना करण्याआधी भवानी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुळजापुरात येतात. आज (बुधवारी) दिवसभर अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, संभाजीनगर, जळगाव, भुसावळ, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधून अनेक नवरात्र मंडळे भवानी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुळजापुरात आले. त्यानंतर वाजत-गाजत तुळजाभवानी मंदिरामध्ये असणाऱ्या होमकुंड येथील दिव्याला आपली भवानी ज्योत प्रज्वलित करत आई राजा उदो उदो जयघोष केला. त्यानंतर ती भवानी ज्योत घेऊन ते पायी चालत तुळजापुरातून बाहेर पडले. सुमारे साडेचार हजार मंडळे भवानी ज्योत प्रज्वलित करून तुळजापुरातून दिवसभरात मार्गस्थ झाली. तुळजापूर येथे नवीन बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्याच दिवशी हा चिखल आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT