तुळजापूर ः महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेचे भाविकांना सिंह गाभार्यातून धर्म दर्शन घेता येणार आहे. शिवाय, देणगी दर्शनाचाही लाभ घेता येईल.
तुळजापूरच्या मंदिरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे सिंह गाभार्यातून होणारे धर्म व देणगी दर्शन दि. 1 ते 20 ऑगस्ट या काळात बंद ठेवण्यात आले होते. या काळात पूजा प्रकारातील इतर धार्मिक विधी, पंचामृत अभिषेक, सिंहासन महापूजा व मातेचे मुख दर्शन आदी सेवा नियमित सुरू होत्या. दरम्यान, सिंह गाभार्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने आज गुरुवारपासून (दि. 21) देवीभक्तांना दर्शन सुरू करण्याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी आदेश जारी केला.
गेल्या काही महिन्यांपासून पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शना खाली मातेच्या मंदिरात जीर्णोद्धाराची कामे प्रगतिपथावर आहेत. या कामामुळे देवी दर्शनार्थ बाहेरून येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर संस्थानने धर्म आणि देणगी दर्शन बंदचा निर्णय घेतला होता. सध्या श्रावणमास संपत आला असल्याने येणार्या गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने येणार्या भाविकांना सिंह गाभार्यातून मातेच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
- मातेचे मंदिर उघडण्याची वेळ पहाटे चार वाजता करण्यात आली
- मातेच्या नित्य पूजेची घाट सकाळी सहा वाजता देण्यात येत आहे
- मातेला सकाळी चार तर सायंकाळी दोन तास पंचामृत अभिषेक, सिंहासन महापूजा
-दिवसभरातील इतर वेळेत मातेच्या मुख दर्शनाचा भाविकांना लाभ घेता येणार