The Shakambhari Navratri festival has begun in Tuljapur.
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा ः कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास (धाकटा दसरा) मंगळवारी घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजता मंदिरातील गणेश विहारात मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते सपत्नीक आणि विधिवत घटस्थापना करण्यात आली. यानंतर पुढील सात दिवस नवरात्राचे धार्मिक विधी परंपरागत पद्धतीने संपन्न होणार आहेत.
तत्पूर्वी, गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेली देवीची मंचकी निद्रा संपवून पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवीची सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीचे भोपे पुजारी अमरराजे कदम, सचिन परमेश्वर, शशिकांत पाटील, अतुल मलबा, विकास मलबा, शशिकांत परमेश्वर, अजित परमेश्वर यांच्यासह इतर पुजारी बांधवांनी देवीची चलमूर्ती हातावर उचलून मुख्य सिंहासनावर परंपरागत पद्धतीने विराजमान केली. त्यानंतर देवीला दही-दुधाने अभिषेक घालण्यात आला व मानाच्या आरत्या करण्यात आल्या.
दुपारी 12 च्या सुमारास वाजत-गाजत घटाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर घटस्थापना विधी पार पडला. या मंगलप्रसंगी तहसीलदार माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले, बाळासाहेब शामराज, मकरंद प्रयाग, श्रीराम अपशिंगेकर, सुनील लसणे, इंद्रजीत साळुंखे यांच्यासह इतर पुजारी, मानकरी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाकटा दसरा महत्त्वाचा धाकटा दसरा म्हणून प्रसिद्ध असणारा देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव या शक्तिपीठाच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये अत्यंत मोलाचा आहे. प्रशासनाकडून यावर्षी करण्यात आलेले नवरात्राचे नियोजन उत्तम असून, सर्व धार्मिक विधी उत्साहात पार पडतील. -अनंतराव कोंडो, अध्यक्ष, तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळ