तुळजापूर : येथील अत्यंत गर्दीच्या भागातील साडेतीनशे दुकानांसमोरील अतिक्रमणांवर पालिकेने गुरुवारी (दि. २३) हातोडा चालवला. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली.
तुळजाभवानी देवीच्या मंदिराकडे येणाऱ्या दोन प्रमुख मार्गावरील चौकटीच्या बाहेर असणारे नालीवरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्त आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव विभागाने काढले. दीपक संघ ते तुळजाभवानी मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर ते कमान वेस, धाराशिव रोड, खडकाळ गल्ली या अत्यंत गर्दीच्या भागात अनेक वर्षांपासून घरगुती आणि व्यापारी यांनी चौकटीच्या बाहेर नगरपालिकेच्या नाली वरती सुमारे पाच फुटांपासून आठ फुटांपर्यंत अतिक्रमण केले होते. यामुळे रस्ते अरुंद होऊन भाविकांना त्रास होत होता, अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवून देखील हे अतिक्रमण काढले गेले नव्हते. नवीन आलेल्या नगरपरिषद नगरसेवक व प्रशासन यांच्याकडून ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी व्यापाऱ्यांना तोंडी आणि लेखी सूचना देखील दिल्या गेल्या होत्या.
अखेर २३ एप्रिल रोजी सकाळी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त आणि अतिक्रमण हटाव पथक याशिवाय तांत्रिक कामगार जेसीबी ट्रॅक्टरसारखे वाहन मशिनरी यांच्यासह तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात ही मोहीम राबवली दिवसभर चाललेल्या या मोहिमेमध्ये साडेतीनशे ते चारशे दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. यामध्ये व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अनेक व्यापाऱ्यांनी यासंदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी वेळ मागणी केली परंतु प्रशासनाकडून सरसकट आणि सक्तीने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. ही मोहीम पुढील तीन-चार दिवस चालणार असल्याची माहिती या निमित्ताने मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दिली. अडथळा येणाऱ्या सर्व घटकांना रस्त्यावर कोणताही व्यवसाय करता येणार नाही याची सूचना देखील पालखीच्या वतीने छोट्या व्यापाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. या भागात रस्त्यावर अडथळा निर्माण होणारे व्यवसाय करता येणार नाहीत असेही सांगण्यात आले आहे.