Dharashiv News : संविधानाच्या जागरासोबत विद्यार्थ्यांचा नशामुक्तीचा संकल्प  file photo
धाराशिव

Dharashiv News : संविधानाच्या जागरासोबत विद्यार्थ्यांचा नशामुक्तीचा संकल्प

धाराशिवमध्ये संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली; उद्देशिकेचे सामूहिक वाचन

पुढारी वृत्तसेवा

Students’ pledge for a drug-free life, alongside the celebration of the Constitution

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांचा जागर करीत शहरातील विद्यार्थ्यांनी संविधानाप्रती आदर आणि नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला. भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद कन्या प्रशालेत आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच शहरातून जनजागृती रॅली काढून नशामुक्त धाराशिवचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

डॉ. संदीप तांबारे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, समाजकल्याण अधिकारी सनम लांबकाने यांची उपस्थिती होती. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईडचे विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुढे जिल्हा परिषद येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नशामुक्त्तीच्या घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी लांडगे, विस्तार अधिकारी मैंदरगी, जंगम, समाजकल्याण निरीक्षक अतुल जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

संविधान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता प्रदान केली आहे. या मूल्यांची जाणीव विद्यार्थिदशेतच रुजावी आणि तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहून जबाबदार नागरिक म्हणून घडावी, या उद्देशाने संविधान दिनी नशामुक्त्तीचा संदेश देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT