धाराशिव : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा नाही, अनेक शेतकर्यांना भूसंपादनाच्या नोटिसा नाहीत, शेतकर्यांनी घेतलेल्या हरकतीवर सुनावणी घेतल्या नाहीत, भूसंपादनानंतर मोबदला किती द्यायचे याचे दर निश्चित नाहीत, पण शेतकर्यांच्या तक्रारी न ऐकता राज्यातील जनतेवर व शेतकर्यांवर शक्तिपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवणे थांबवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला.
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील पोलिस व अधिकार्यांच्या दांडगाव्याने सुरू असलेली सक्तीची मोजणी बंद पाडल्यानंतर राजू शेट्टी यांनी थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, सध्या रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग अस्तिवात असताना राज्य सरकारकडून 86 हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता नसताना हा प्रकल्प जनतेवर लादला जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याची गोष्ट वित्त विभागाने सांगितली असतानाही एवढा अट्टाहास 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच होत आहे.