Pratap Sarnaik : शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एस.टी.ची लवकरच हेल्पलाईन File Photo
धाराशिव

Pratap Sarnaik : शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एस.टी.ची लवकरच हेल्पलाईन

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती : घर ते शाळा प्रवास करणार सुलभ

पुढारी वृत्तसेवा

ST helpline soon for school and college students

धाराशिव : पुढारी वृत्तसेवा शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सुरक्षित आणि वेळेवरील एस.टी. प्रवासाचा प्रश्न गंभीर होत असताना, राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. लवकरच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एस.टी.ची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी शनिवारी दिली. घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एस. टी. प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एस.टी. बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी, विद्यार्थिनींना योग्य ती मदत मिळणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक शनिवारी धाराशिव दौऱ्यावर आले होते. यावेळी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी याबाबत अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधीअंतर्गत राज्याच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी मानव विकास बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

त्या बसेस विशेषतः शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्याच्या सक्त सूचना असताना अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केली जाते, शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे, यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच, संध्याकाळच्या वेळी बसेस वेळेवर न आल्याने अथवा रद्द झाल्याने घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत.

याचा विपरीत परिणाम म्हणून काही विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत, अशा तक्रारीही काही विद्यार्थ्यांनी मंत्री सरनाईक यांच्यापुढे मांडल्या. त्यावर एस.टी. प्रशासनाने या तक्रारी गांभीर्याने घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या.

लवकरच हेल्पलाईन सुरू होणार

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादुरुस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एस.टी. च्या हेल्पलाईन क्रमांकवर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येईल. तसेच, ३१ विभागांतील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येतील, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी - विद्यार्थिनीदेखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात, असे यावेळी परिवहनमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT