तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या विकासकामांना धार्मिक अधिष्ठान लाभावे, यासाठी बुधवारी (२९ जुलै) स्थानिक ब्रह्मवृंदांकडून विशेष मंत्रपठण विधी झाला. यामध्ये गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्री रूद्र जप तसेच दुर्गा सप्तशती पारायण हे धार्मिक विधी पार पडले.
प्रारंभी मंदिरातील उजव्या सोंडेच्या श्री गणेश मूर्तीला यजमान उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांनी सपत्नीक अभिषेक केला. त्यानंतर मातेसमोरील भवानी-शंकराला पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच श्री तुळजाभवानी देवींच्या अभिषेक व संकल्प विधीसाठी भोपे पुजारी संघटनेचे अध्यक्ष अमर कदम हे यजमान म्हणून सपत्नीक उपस्थित होते. श्री देवींचे मळवट चोपल्यानंतर तिन्ही यजमानांनी श्री तुळजाभवानी देवींची महाआरती केली.
श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामे सुरळीत, निर्विघ्न व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत याकरिता परमपूज्य जगद्गुरू शंकराचार्य, श्री श्री भारतीतीर्थ महासन्निधानम् (शृंगेरी, शारदापीठ) यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांच्या सूचनेनंतर धार्मिक विधीबाबत विश्वस्त मंडळ, प्रशासन, महंत व तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष या सर्वांच्या चर्चेनंतर कार्यवाही पार पाडली.
यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), धार्मिक व्यवस्थापक, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, सरकारी उपाध्ये सुनीत पाठक, मंदिर संस्थानचे कर्मचारी तसेच भाविक आणि पुजारी बांधव उपस्थित होते. गुरूच्या अस्तामुळे या धार्मिक विधीला मान्यता नाही -नागेशशास्त्री अंबुलगे दरम्यान, गेल्या १७जुलैपासुन गुरू ग्रहाचा अस्त झालेला असल्याने या अस्तादिकात कोणतेही महत्त्वाचे धार्मिक कार्य, विधी करता येत नाही, असे शास्त्र सांगते.
याबाबत संकेश्वर येथील शंकराचार्य व धारवाड येथील पं. राजेश्वर शास्त्री यांनीही या शास्त्राला दुजोरा देत श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर हा विधी करण्याचा सल्ला मंदिर संस्थानला दिला असताना श्री तुळजा भवानी मंदिरामध्ये २९ जुलै रोजी उपाध्ये पुजारी मंडळाकडून श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री गणपती अथर्वशीर्ष पाठ, व रूद्र जप हे विधी करण्यात आले.
या धार्मिक विधीची माहिती उपाध्ये पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी भ्रमणध्वनीवर दिल्यानंतर स्थानिक उपाध्ये पुजाऱ्यांना वर्णी देण्यात आली ती चुकीची आहे. जिर्णोद्धार चालन विधी श्रृंगेरी येथील श्री विधुशेखर भारती शंकराचार्य व काशी येथील गुरूवर्य वेदमूर्ती गणेश्वर द्रविड शास्त्री यांनी सांगितलेला हा पूर्ण विधी करण्यात यावा यासाठी मंदिर संस्थानला १५ जुलै रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तरीही हा विधी उरकण्याचा घाट घातला गेला जो चुकीचा आहे.
हा विधी थांबवून तो विधी ९ ऑगस्ट रोजी गुरूचा उदय झाल्यावर करण्यात आल्यावरच त्याला धर्मशास्त्राची मान्यता मिळणार होती व त्याचे उचित फळप्राप्ती शक्य होती, असे मत मंदिरातील लक्ष्मी नरसिंह मंदिराचे पुजारी व बंदिबुवा ट्रस्टचे अध्यक्ष नागेशशस्त्री अंबुलगे यांनी व्यक्त केले.