Dharashiv News : नाम, पर्याय संस्थेतर्फे महिला शेतकऱ्यांना सोयाबीन वाटप file photo
धाराशिव

Dharashiv News : नाम, पर्याय संस्थेतर्फे महिला शेतकऱ्यांना सोयाबीन वाटप

नाम फाउंडेशन व पर्याय फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोक पर्याय डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बचत गटातील सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रम, १०० महिला सदस्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Soybean distribution to women farmers by the Nam Foundation

कळंब, पुढारी वृत्तसेवा : नाम फाउंडेशन व पर्याय फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोक पर्याय डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बचत गटातील सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात कळंब तालुक्यातील आडसूळवाडी, कोठाळवाडी, जवळा खुर्द, खामसवाडी आणि मोहा येथील १०० महिला सदस्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप शुक्रवारी (दि. २६) हासेगाव (के.) येथे करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना पर्याय फाउंडेशनचे प्रमुख विश्वनाथ अण्णा तोडकर म्हणाले, "महिलांच्या सक्षमीकरणासाठी पर्याय फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. तुमच्यावर कोणतीही आर्थिक अडचण आली तरी तुम्हाला एकटे सोडणार नाही. महिलांनी स्वावलंबी व्हावे, शेती व बचतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी नाम फाउंडेशन व पर्याय फाउंडेशन विविध उपक्रम राबवत आहे.

भविष्यातही प्रत्येक संकटात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. यावेळी पर्याय फाउंडेशनचे संचालक ऋषिकेश तोडकर यांनी बचतीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "बचत ही प्रत्येक कुटुंबाची आर्थिक ताकद आहे. नोटबंदी, कोरोना काळ तसेच इतर संकटांच्या वेळी महिलांनी बचत गटातून साठविलेल्या रकमेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला.

त्यामुळे प्रत्येक महिलेने नियमित बचतीची सवय लावून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा." कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकल महिला संघटना प्रमुख कल्पना जतकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा सुनंदा खराटे यांनी केले. त्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

तर पर्याय फाउंडेशनचे जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रा. अविनाश घोडके यांनी उपस्थित मान्यवर, महिला सदस्य व आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमास लोक पर्याय डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बचत गटातील महिला सदस्य, विविध गावांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT