भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या पावसाने यंदा जून सुरु झाल्यापासून जिल्ह्यात दडी मारली आहे. यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलसरपणा काही प्रमाणात टिकून राहिला असला तरी, जून महिन्याच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत (दि. १७) केवळ २३.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ४.७३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला असून हे पीक अडचणीत सापडले आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंतच्या पावसाची आकडेवारी चिंताजनक असून, जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मात्र, पेरणी होऊन आता महिना उलटला तरी पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके कोमेजू लागली आहेत. पाने पिवळी पडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सोयाबीनसोबतच उडीद, मूग आणि इतर कडधान्यांच्या पिकांनाही पावसाची गरज आहे. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे मिळालेला तात्पुरता आधार आता कमी पडू लागला असून, जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे.
पावसाची ही स्थिती कायम राहिल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. बियाणे, खते, मशागत यासाठी केलेला खर्च पुन्हा करण्याच्या कल्पनेने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही घोंघावत आहे. या घडीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्व आशा वरुणराजावर खिळली आहे. त्यांना तात्काळ मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, ही प्रतीक्षा कधी संपते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात २०२. १ मिमी पैकी १४३.४ मिमी पाऊस झाला आहे. जो वार्षिक सरासरीच्या (६०३.१ मिमी) केवळ २३.८ टक्के आहे. १७ जुलैपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस वार्षिक टक्केवारीत असा : धाराशिव - १५.२, भूम - १७.८, कळंब - १९.९, परंडा - २२.२, वाशी - २३.८, उमरगा - ३४.१, लोहारा - ४५, तुळजापूर - २८.७ मिमी.
"मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे वेळेत खरिपाची पेरणी केली. पण आता पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ थांबलेली आहे. उडीद पिकावर मावा आणि पान गुंडाळणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. करपा रोग दिसू लागला आहे. हवामान स्थिर नसेल तर हे नुकसान आणखी वाढू शकतं. शासनाने वेळेत मदत आणि मार्गदर्शन करावे.- बबन सोमनाथ भोळे, शेतकरी, भूम.