धाराशिव : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम कंत्राटदाराच्या मनमानी पद्धतीने होत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका भविष्यातही कायम राहणार आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी लावून असल्याने या कामाचा दर्जा खालावल्याने चित्र आहे.
एमआयडीसी ते वरुडा उड्डाण पुलापर्यंत अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड ठिकठिकाणी खचला आहे. त्यावरही केवळ मलमपट्टीचे काम सुरू आहे. आणखी काही दिवसांनी रस्ता खचलेल्या ठिकाणच्या नाल्या मोडून पडण्याचा धोका आहे.
हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी विविध लोकप्रतिनिधी सातत्याने भेटी देतात आहेत. दौरे करीत आहेत. तरीही कामात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. आ. कैलास पाटील यांनी महिनाभरापूर्वीच या कामाची पाहणी करून सूचना केल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार या लोकप्रतिनिधींनाच आव्हान देत असल्याचे दिसू लागले आहे.
सांजा चौक ते डीमार्ट पर्यंत राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मध्ये जाळी उभी करताना चलाखी केली जात आहे. एका बिअर बारच्या समोर जाळी न जोडता मध्येच मोकळे सोडण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी अपघातांचा धोका बाढणार आहे. याच ठिकाणी दुभाजका मध्ये मुरुमही टाकण्यात आलेला नाही. स्ट्रीट लाईटची केबल उघड्यावर आहे. हे धोके लक्षात घेता या ठिकाणी अशी हुशारी कंत्राटदाराने केली व महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम वर्षभरापासून सुरू आहे. अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. सांजा चौक ते बीएएमएस कॉलेजपर्यंतचे काम तर कमालीचे संथ गतीने सुरू आहे. विद्यामाता शाळेपासून पुढे दोन्ही बाजूंनी काम सुरूच आहे. एका ओड्यावरील पुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. कचरा डेपोच्या बाजूकडील सव्र्व्हिस रोड अतिशय अरुंद झाला असून त्यावरही प्रशासनाने काही मार्ग काढलेला नाही. या दिशेचे नालीकाम आता सुरू झाले आहे. तर टापरे बिल्डिंग समोरील पुलाचे कामही रखडले आहे. वास्तविक इथेच अपघातांची मालिका सुरु असते.
वरुडा उड्डाणपूल ते सांजा चौक या रस्त्यावर अनेक मांसाहारी हॉटेल्स तसेच बिअर बार आहेत. त्यामुळे अनेकदा वाहने रस्त्यावर उभी केली जातात. बार, हॉटेलचे पार्किंग आता सर्व्हिस रोडवर केले जात आहे. रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांना या रस्त्याचा वापर करताना मोठा त्रास होऊ लागला आहे. अनेक छोटे अपघातही सातत्याने घडू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाईची करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.