तुळजापूर ः श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर विकास आराखड्यास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सुमारे 22 हजार 558 चौरस मीटर खासगी जागा थेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य सरकारने 28 मे 2025 रोजी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 1 हजार 865 कोटी रुपये खर्चाच्या प्रक्रियेस मान्यता दिली आहे.
या विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात पायाभूत सुविधांसह विकासकामे केली जाणार आहेत. तुळजाभवानी मंदिराजवळील अंदाजे 22 हजार 558 चौरस मीटर खासगी जागा थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. संबंधित जागेवर सध्या वास्तव्य करणार्या आणि मालकी हक्क असलेल्या व्यक्तींचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. याकामासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील विद्यार्थी, नगर परिषद कर्मचारी, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी, तसेच तहसील कार्यालयातील कर्मचार्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत संबंधित घरमालक, भोगवटादार किंवा मालमत्ताधारक यांची सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक माहिती संकलित केली जात आहे. संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रिया व्हिडीओग्राफीद्वारे पार पडली जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे.
सर्वेक्षणार्थींना नागरिकांनी आपली अचूक व सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वेक्षण प्रक्रियेविषयी नागरिकांच्या काही शंका अथवा अडचणी असल्यास त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.