धाराशिव : आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे, अशी भावना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. अपघातापूर्वी अर्धा आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाल्याचे सांगत त्यांना प्रतिक्रिया देताना हुंदका आवरता आला नाही.
आ. पाटील यांनी सांगितले, की लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं. व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे, ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले.मन अक्षरशः सुन्न आहे.
अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं, ते शब्दांत मांडणं खूप कठीण आहे.
क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं, याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे, माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही.