Rabi sowing begins in Dharashiv taluka; Farmers' concerns remain
कसबे तडवळे, पुढारी वृत्तसेवा धाराशिव तालुक्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती. परंतु सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पेरणीला विलंब झाला असून, सध्या तालुक्यात सुमारे ४० टक्के पेरणी झाल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने आणि थंडीची चाहूल लागल्याने जमिनीचा वापसा होऊ लागला असून, अनेक ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. तडवळे परिसरासह काही गावांमध्ये शेतकरी पेरणीसाठी शेतात उतरलेले दिसत आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी आधीच पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचल्याने बीज कुजणे, अंकुर न येणे, रोपे मरून जाणे अशा समस्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खरिपातील अतिवृष्टी आणि रब्बीतील विलंबित पेरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. रब्बी ही जाते का धावून? असा सवाल सध्या धाराशिव तालुक्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.