धाराशिव : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची सुमारे ९ हजार हेक्टर शेती जमीन खरडून गेली आहे. या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी खरडलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करण्याबाबत कृषी तज्ज्ञांकडून एका महिन्यात अहवाल मागवावा, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. विक्रम काळे, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, "खरडलेल्या जमिनीवर हायड्रोफोनिक शेती करता येईल का, याचा अभ्यास करावा. पंचनाम्यात मयत जनावरांच्या पशुपालकांना तातडीने मदत द्यावी. पुरामुळे नुकसान झालेल्या विहिरींची नोंद सातबारावर नसली तरी त्यांनाही मदत मिळाली पाटील यांनी पाहिजे." आ.पाटील यांनी बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासन निर्णयात बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच चाऱ्याची मागणी असलेल्या भागात तत्काळ चारा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. आ. कैलास पाटील यांनी पूरग्रस्त गावांमध्ये प्राधान्याने मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, ५ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ९ व्यक्तींच्या मृत्यूस ३६ लाखांची मदत देण्यात आली आहे. १७ऑक्टोबरपर्यंत विशेष ग्रामसभांमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे जाहीर केली जाणार असून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
महाविकास आघाडीचा घेराव
दरम्यान ही बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना सभागृहाच्या प्रांगणात घेराव घालण्यात आला. शहरातील रखडलेली १४० कोटी रुपयांची रस्त्याची कामे कधी मार्गी लागणार, असा सवाल यावेळी करण्यात आला. आ. कैलास पाटील, सोमनाथ गुरव, अग्निवेश शिंदे, धनंजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. आ. पाटील यांनी शहरातील नागरिकांचे हाल होत असल्याने ही रस्त्याची कामे तातडीने सुरु करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास भविष्यात दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला.