उमरगा शहरातील वीज उपकेंद्रातील ३३ केव्ही रोहीत्र शुक्रवारी बंद पडले.  Pudhari News Network
धाराशिव

Dharashiv News : उमरगासह १२ गावे दोन दिवसांपासून अंधारात

पुढारी वृत्तसेवा

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : उमरगा शहरातील १३२ केव्ही वीज उपकेंद्रात असलेल्या ३३ केव्ही रोहीत्र शुक्रवारी (दि २८) बंद पडले. त्यामुळे दोन दिवसांपासून अर्धे शहर व परिसरातील १२ गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़. शहरात विविध कामकाजासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी, महिला व नागरिकांना विजेअभावी दिवसभर ताटकळत बसावे लागले. शेवटी काम न करताच माघारी परतावे लागले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना दिवसभर अनेक संकटाचा सामना करावा लागला. तर नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. दिवसभरही वीज वाहिनीचे काम सुरू असल्‍याने पुरवठा बंद होता.

३३ केव्ही रोहित्रामध्ये मोठा बिघाड

उमरगा शहरातील ३३ केव्ही क्षमतेच्या रोहित्रातून शहर व परिसरातील १२ गावासह शेतीला वीज पुरवठा करण्यात येतो. शुक्रवारी सकाळी येथील ३३ केव्ही रोहित्रामध्ये मोठा बिघाड झाला. यातंर्गत असलेल्या शहर व गावांतून वीज गायब झाली. त्यानंतर अर्ध्या शहरासह १२ गावाचा वीज पुरवठा खंडित झाला. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांना कडक उन्हामुळे संपूर्ण दिवस घराबाहेर बसून काढावा लागला. शहरातील अनेक कार्यालयांत खंडित विजेमुळे दिवसभर कामे खोळंबली होती. कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात हेलपाटा पडल्‍याने महावितरण च्या भोंगळ कारभाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

दरम्यान दुसर्या ठिकाणाहून रात्री उशिरा पर्यंत शहरातील वीज पुरवठा करण्याच्या हालचाली करण्यात आल्या. तर अनेक गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. तसेच विद्यार्थ्यांच्या रात्री व पहाटेच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. विजेअभावी पिठाची गिरणी बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठा योजना विजेअभावी ठप्प पडली आहे. वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यातच रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांवर विजेचे संकट ओढवले आहे.

मुख्य रोहीत्राची रात्री उशिरा पर्यंत चाचणी सुरू

महावितरणच्या लातूर येथील चार ते पाच तज्ञ अभियंत्याकडून बंद पडलेल्या मुख्य रोहीत्राची रात्री उशिरा पर्यंत चाचणी सुरू होती. रोहित्रातील नेमका दोष शोधण्याच काम सूरू होते. तर बंद पडलेल्या रोहित्राबाबत यापूर्वी अनेकदा वरिष्ठांना कळविण्यात आले होते. मुख्य रोहित्र जळाले असून याच्या दुरुस्ती साठी पंधरा ते वीस दिवस लागू शकतात अशी माहिती वीज उपकेंद्रातील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटींवर दिली. तर शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून अधिकारी धारेवर

शहर व तालुक्यात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तब्बल ५७० कोटीचा निधी आणला आहे. त्यात विद्युत पुरवठा यासाठीचा ही निधी आहे. त्यातून काही ठिकाणी नव्या उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार कायम आहे. याबाबतचया आढावा बैठकीत आमदार चौगुले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तरिही यात कसलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांची खंडित वीज पुरवठ्यापासून सुटका कधी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणचे वरातीमागून घोडे!

उमरगा शहर आणि परिसरातील १५ गावांचा शुक्रवारी पहाटे पासूनच वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील १३२ केव्ही वीज उप केंद्रातील मुख्य ट्रान्स्फॉर्मर मध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तोपर्यंत अन्य उपकेंद्रातून तात्पुरता वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. असा एसएमएस विज कंपनीकडून सायंकाळी देण्यात आला. शहरात काही भागांत वीज पुरवठा सुरू होता, तोही कमी दाबाने ग्रामीण भागातील १५ गावांचा वीज पुरवठा ३० तासांनंतरही सुरळीत झाला नव्हता.

शहर व तालुक्यात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार नागरिकांच्या आता अंगवळणी पडला आहे. वीज वितरण कंपनीला पावसाळा सुरू होण्याचे निमित्तच लागते. पावसाचे दोन थेंब पडले की रात्रभर वीज गायब मोठा पाऊस झाला तर दोन दिवस गायब असते. वीज का गेली, ती परत कधी येणार? याची माहिती नागरिकांना मिळत नाही. कार्यालयात फोन लावला तर प्रतिसाद मिळत नाही. - तुकाराम बिराजदार, नागरिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT