धाराशिव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान प्रक्रिया पार पडली.  pudhari photo
धाराशिव

Posthumous Body Donation : वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान

कॉलेज सुरू झाल्यानंतर धाराशिवमधील आठवे देहदान

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पार पडले. ईटकूर (ता. कळंब) येथील 65 वर्षीय आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जिवंतपणी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार व पूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आले.

कै.आशाबाई गंभीरे व त्यांचे पती गोविंद गंभीरे या वृद्ध दाम्पत्याने जिवंतपणीच देहदानाचा संकल्प केला होता. पत्नीच्या निधनानंतर पती गोविंद गंभीरे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे.

या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना अभ्यास व संशोधनासाठी उपयुक्त संधी मिळणार असून, भविष्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे.शरीररचनाशास्त्र विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

या कार्यात डॉ.स्वाती पांढरे, डॉ. विश्वजीत पवार, डॉ.सुवर्णा आनंदवाडीकर,डॉ. नितीन भोसले, डॉ. विवेक कोळगे, डॉ.अरबाज ढवळीकर, अधिसेविका सुमित्रा गोरे, प्रशांत बनसोडे, वरिष्ठ लिपिक जीवन गंभीरे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. संपूर्ण प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देहदान करणाऱ्या गंभीरे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT