पाशा पटेल pudhari photo
धाराशिव

Pasha Patel : नुकसानीची सवय लावून घ्यावी लागेल

पाशा पटेल यांच्या वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : मराठवाड्यासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रकरणी ते सरकारकडे मदतीसाठी याचना करत असताना भाजप नेते तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. वर्षातील 365 दिवसांत शेतकर्‍यांवर संकटे येणार आहेत. त्यामुळे आता आपल्याला असे नुकसान सहन करण्याची सवयच लावून घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. त्यांच्या टीकेचे राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटत आहेत.

पाशा पटेल यांनी धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकर्‍यांना अशा नुकसानीची सवय लावून घ्यावी लागेल, तसेच निसर्गाच्या र्‍हासाची कर्मफळे आपल्याला भोगावीच लागतील असे असे म्हंटले आहे.

निसर्गाच्या र्‍हासाची कर्मफळे भोगावीच लागतील

सध्या अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने पावसाने नुकसान झाले आहे, ते पाहता त्या नुकसानीची कुणालाही भरपाई करता येणार नाही. शेतकर्‍यांचे जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे नुकसान भरून काढण्याची क्षमता कुणाचीच असू शकत नाही. सरकार फक्त मदत करू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी नुकसान सोसण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कधी जास्त पाऊस होऊन, तर कधी कमी पाऊस पडून कधी गारपीट, कधी थंडीमुळे शेतकर्‍यांवर संकटे येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

लज्जास्पद विधान : अंबादास दानवे

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याप्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान हे केवळ निसर्गाचे कर्मफळ नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. शेतकर्‍यांना आधार देण्याऐवजी असे बेजबाबदार विधान करणे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही याप्रकरणी पाशा पटेलांवर टीका केली आहे. पाशा पटेल यांना शेतकर्‍यांच्या दुखण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता जास्त आहे. शेतकरी अतिवृष्टी आणि आर्थिक संकटातून जात असातना त्यांना असे सल्ले देणे म्हणजे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, त्यांना संकटाची सवय लावण्याचा सल्ला देण्याची नाही, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT