Omraje Nimbalkar Viral Audio Pudhari
धाराशिव

Omraje Nimbalkar Viral Audio: लाईनमन म्हणून हिनवू नका, खासदार ओमराजे निंबाळकरांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल

Omraje Nimbalkar Viral Audio: खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका तरुणामधील डीपीच्या कामासंदर्भातील कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Omraje Nimbalkar Viral Audio: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका तरुण शेतकऱ्यामधील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रान्सफॉर्मर (डीपी) बसवण्याच्या कामात होणारा विलंब, त्यासाठी शेतकऱ्यांना घालाव्या लागणाऱ्या फेऱ्या आणि त्यावरून झालेला वाद यामुळे या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

डीपीच्या कामावरून नाराजी

व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओनुसार, एका तरुणाने आपल्या परिसरातील डीपी बसवण्यास होणारा विलंब आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वेळा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे केली. एका ट्रान्सफॉर्मरसाठीच जर ५० ते १०० वेळा पाठपुरावा करावा लागत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांचे काय, असा सवाल त्याने उपस्थित केला.

'लाईनमन म्हणून हिणवू नका'

या चर्चेदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, "आम्हाला लाईनमन म्हणून हिणवू नका," अशी भावना व्यक्त केल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. लोकप्रतिनिधींना केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे पाहू नये आणि परिस्थितीचीही जाणीव ठेवावी, असा त्यांचा सूर असल्याचे संभाषणातून दिसून येते.

'विरोधात असताना परिस्थिती वेगळी होती'

तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना निंबाळकर यांनी आपण विरोधी पक्षात असताना विकासकामे मार्गी लावणे किती कठीण होते, याचा उल्लेख केला. विरोधात असताना ट्रान्सफॉर्मरसारखी मूलभूत कामेही मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता, असे त्यांनी संभाषणात म्हटल्याचे समोर आले आहे.

तरुणाचे प्रत्युत्तर

मात्र, तरुणाने, "विरोधात अनेक लोक अनेक वर्षे काम करत होते, तुम्ही एकटेच विरोधात नव्हतात," असे स्पष्टपणे सांगितले. तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवाबद्दल बोलताना, त्या काळात आपणही पक्षासाठी काम केलं होतं आणि निकालामुळे आम्हालाही वाईट वाटले होते, असेही त्याने नमूद केले.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी संभाषणातील संपूर्ण संदर्भ न पाहता निष्कर्ष काढू नयेत, असेही म्हटले आहे.

दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत किंवा तिच्या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT