धाराशिव : उबाठाचे धाराशिवमधील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याची घोषणा रविवारी (दि.२०) केल्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्ण झाले आहे. निंबाळकर यांचा प्रवेश रोखण्यासाठी ठाकरे यांच्याकडून गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, परंतु पुणे येथून धाराशिवला परतल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत केलेल्या चर्चेअंती ओमराजे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत असल्याचे स्पष्ट केले.
निंबाळकर यांनी दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चेतून त्यांचा कल हा शिंदे सेनेकडे असल्याचे स्पष्ट झाले होते, परंतु औपचारिक घोषणा न केल्यामुळे याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा केली.
जनतेसाठी २४ तास उपलब्ध राहूनही आपण स्थानिक स्वराज संस्थांमध्ये वाईट रीतीने पराभूत झालो, ही सल प्रारंभीच त्यांनी बोलून दाखविली. सता नसल्यामुळे काही कामे करता आली नाहीत. त्यामुळे धाराशिवच्या विकासकामांसाठी व काही मंडळींचा असणारा दबाव रोखण्यासाठी आपण शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारीत असल्याचे ओमराजे म्हणाले.
कृष्णा मराठवाडा खोरे प्रकल्प, बॅरेजेसची कामे याचा आराखडा तयार असूनही ही कामे पुढे सरकली नाहीत, याकडे लक्ष वेधून खासदार या नात्याने सता पक्षात गेल्यानंतर जेवढी कामे करता येतील तेवढी करू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अन्य नेत्यांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करतानाच ओमराजे यांनी कोणत्याही कार्यकर्त्याने मातोश्रीच्या विरोधात पोस्ट अथवा मत प्रदर्शित करू नये, असे आवाहन केले.
अमित शहांशी चर्चा
पवनराजेप्रकरणी सीबीआय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपल्याशी संपर्क साधला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणे करून दिले. ज्या कारणासाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून संघर्ष करीत आहोत, त्यास न्याय द्यावा, अशी मागणी आपण शहा यांच्याकडे केली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सीबीआयने हायकोर्टात दाद मागावी, असे निर्देश शहा यांनी दिले, असे ओमराजे म्हणाले.