धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्यात बार्शी नाका ते सांजाचौक या रस्त्यावर तब्बल तीन वेळा खड्डे बुजविण्याचे काम करावे लागले आहे. वास्तविक मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया पार पडूनही त्याची 'वर्क ऑर्डर' अडकल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरुन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ऐन दिवाळीत नागरिकांना रस्त्यांवर उडणार्या फुफाट्यात खरेदीचा अनुभव घ्यावा लागत आहे.
धाराशिव शहरातील मुख्य रस्ते तर खड्डेमय झाले आहेतच. मात्र गेल्या काही वर्षात शहरातील, उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांचीही पुरती वाट लागली आहे. यंदा पावसाळा मेच्या २० तारखेपासून सुरु झाला तो साधारण २० ऑक्टोबरपर्यंत सुरुच होता. म्हणजेच तब्बल सहा महिने शहरात सातत्याने पाऊस झाला, परिणामी रस्तेच सुस्थितीत नसलेल्या धाराशिवकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक राज्य सरकारने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी एक शासनादेश जारी करुन शहरासाठी १४०.५८ कोटी रुपयांचे रस्ते मंजूर केले होते.
या रस्त्यांची संख्याही ५९ इतकी होती. म्हणजेच शहरातील बहुतांश भागातील डीपी रोड मंजूर झाले होते. अपवाद वगळता सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होते. या जीआरनंतर ८ ते २८ मार्च या कालावधीत निवीदा स्वीकारण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तर २९ मार्च रोजी ती उघडण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एक व दुसरी धाराशिव शहरातील कंपनीला काम देण्यावरुन मतभेद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या रस्त्याची कामे रखडली. सर्व प्रक्रिया पार पडूनही केवळ मर्जीतल्या कंपनीला काम देण्यावरुन कुरघोडी झाल्याने ५९ रस्त्यांची काम थंड बस्त्यात पडली आहेत.
दरम्यान, हे काम मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणूक होती. त्यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत तसेच भाजपचे आ. राण- जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी 'जीआर' निघताच शहरात सर्वत्र फलक लावून १४० कोटी रुपयांची कामे आपणच मंजूर करुन आणल्याचे जाहीर केले होते. या बाबीला आता सात महिने उलटून गेले असले तरी अजूनही वर्क ऑर्डरच दिलेली नाही. परिणामी शहरातील सर्व अंतर्गत रस्ते धुळीने माखले असून मुख्य रस्ताही खड्डेमय झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच एका तरुण व्यापार्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील व्यापार्यांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला होता.