धाराशिव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख सी. पी. मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आज दाखल झाले.या पथकाने बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली.
भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळ श्री.सी.पी.मोहन यांनी भारत मोरे,चंद्रकांत मोरे व अमरसिंह ढगे यांच्या शेतीची पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पिके, शेतीजमीन आणि बांधबंदिस्तीचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बाधित शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी श्री.मोहन यांना दिली. यावेळी भूम उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे,तहसीलदार जयवंत पाटील, तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे, मंडळ अधिकारी प्रवीण पारखे व ग्राम महसूल अधिकारी श्रीमती एस.के.खोत प्रामुख्याने उपस्थित होत्या.
चिंचपूर येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे तसेच वालवड येथील पाझर तलावाचे पुरामुळे झालेले नुकसानही पथकाने पाहिले.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. बेलगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या 18 गाई पुरात मृत्युमुखी पडल्या,तर 20 बकऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.जनावरांचा चारा,दूध काढण्याची मशीन,गोठा,शेणखत व कडबा कटरही पुरामुळे वाहून गेल्याची व्यथा श्री.दातखिळे यांनी पथकासमोर मांडली.
या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर कोसळलेले दु:ख आणि उपजीविकेवर आलेले संकट प्रकर्षाने समोर आले.परंडा तालुक्यातील आवार पिंपरी गावालाही केंद्रीय पथकातील सदस्य श्रीमती आशा राणी व मिकी मेकॉन डलबेरा यांनी भेट दिली. गावाजवळून वाहणाऱ्या उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शाळा,अंगणवाडी इमारत व ग्रामपंचायतीच्या आरओ प्लांटची पाहणी करून त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी गावटे,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी तहसीलदार नीलेश काकडे,गटविकास अधिकारी विनोद जाधव,प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री.हाके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहन यांनी परंडा विश्रामगृह येथे तलावातून मासेमारी करणाऱ्या मासेमारी बांधवांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नुकसानीचा सखोल आढावा घेऊन सविस्तर अहवाल तयार करणार असून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना त्यामुळे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.