Yedeshwari Devi : येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ file photo
धाराशिव

Yedeshwari Devi : येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता पारंपरिक घटस्थापनेने प्रारंभ झाला.

पुढारी वृत्तसेवा

Navratri festival of Goddess Yedeshwari begins

येरमाळा, पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता पारंपरिक घटस्थापनेने प्रारंभ झाला. देवीचे मानकरी अमोल पाटील, यशवंत पाटील, पुजारी आणि देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य गाभाऱ्यासह मंदिर परिसरातील मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी पंचोपचार महापूजा आणि महाआरती पार पडली.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवी ओळखली जाते. नवरात्राच्या नऊ दिवसांत देवीच्या तांदळ्यावर विविध रूपांत पूजा केली जाते. घटस्थापनेच्या दिवशी तांदळ्यावर पारंपरिक नागवेलीच्या पानांनी पूजा करण्यात आली पहिल्याच दिवशी दर्शनासाठी येरमाळा आणि पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली. अनेकांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला सलग पाच दिवस खेटे घालण्याची परंपरा आहे.

येरमाळ्यासह मलकापूर, उपळाई, पानगाव, रत्नापूर, दुधाळवाडी आणि बांगरवाडी येथील भाविक यात सहभागी होतात. पहाटेपासून महिला-पुरुषांसह लहान मुले आणि ज्येष्ठांची खेट्यांच्या मार्गावर वर्दळ असते. काही भाविक वर्षभरही ही परंपरा जपतात. नवरात्रोत्सवासाठी मंदिरातील सभामंडपातून दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले.

खेट्यांची परंपरा

येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात डोंगराला पाच दिवस खेटे घालण्याच्या परंपरेला विशेष महत्त्व आहे. श्रद्धेने ही परंपरा जपण्यासाठी दरवर्षी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येरमाळ्यात दाखल होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT