Gold Robbery 
धाराशिव

Gold Robbery | नळदुर्गमध्ये खळबळ! 6 मिनिटांत पतसंस्थेतून 2 कोटी 63 लाखांचे तारण सोने लंपास

Gold Robbery | नळदुर्ग शहरात एका अत्यंत थरारक आणि धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नळदुर्ग (प्रतिनिधी): नळदुर्ग शहरात एका अत्यंत थरारक आणि धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून अंदाजे २ कोटी ६३ लाख रुपये किमतीचे तारण ठेवलेले सोने चोरट्यांनी अवघ्या सहा मिनिटांच्या कालावधीत चोरून नेले. शनिवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिट ते १ वाजून ५९ मिनिटांदरम्यान ही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

चोरीची ही घटना दुसऱ्या दिवशी, उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पतसंस्थेबाहेर दिवसभर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चोरीच्या एवढ्या मोठ्या रकमेमुळे पतसंस्थेचे शाखाधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत चोरीला गेलेल्या सोन्याचे वजन आणि मोजमाप करण्याच्या कामात गुंतले होते. या घटनेमुळे पतसंस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. दुपारी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. श्वानाने मुख्य बाजारपेठेतून अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे नगरपालिका रोड आणि नानिमा दर्गा मार्गे तपास मार्गक्रमण केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनीही तातडीने तपासाला सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायंकाळी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी देखील पतसंस्थेची पाहणी केली.

पोलिसांनी दिवसभर केलेल्या कसून चौकशीनंतर रात्री उशिरा तपासाला मोठे यश मिळाले. पतसंस्थेतील एका कर्मचाऱ्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले. या कर्मचाऱ्यासह या चोरीमध्ये एकूण पाच ते सहा जण सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पतसंस्थेच्या अंतर्गत व्यक्तीचा सहभाग असल्याने या चोरीची गुंतागुंत वाढली आहे.

अवघ्या सहा मिनिटांत झालेली ही मोठी चोरी आणि त्यात पतसंस्थेतील कर्मचाऱ्याचा सहभाग यामुळे नळदुर्ग शहरात आणि सहकार क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, चोरीला गेलेले सोने आणि इतर आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या चोरीच्या घटनेमुळे तारण ठेवलेल्या सोन्याचे मालक असलेले नागरिक देखील धास्तावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT