Meeting with the Chief Minister and Deputy Chief Minister regarding the development of Tuljapur
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांचे प्रश्न, शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी तसेच तुळजाभवानी मंदिर परिसरातील विकासकामांमध्ये पुजारी बांधवांना विश्वासात घेण्याच्या मागणीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री यांच्या 'नंदनवन' बंगल्यावर झालेल्या या भेटीत तुळजापूर शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
तुळजापूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, शहराच्या विकासकामांमध्ये स्थानिक पुजारी बांधवांना विश्वासात घेतले जात नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याची बाब शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेकडो वर्षांची परंपरा, कुलधर्म-कुलाचार आणि पुजारी बांधवांचे धार्मिक महत्त्व याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजाभवानी मंदिर व शहराच्या विकासासाठी पुजारी बांधवांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे मान्य केले. तसेच भविष्यात विकासकामे करताना संबंधित घटकांना सोबत घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
तुळजापूर शहरातील विविध प्रभागांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजापूर शहराच्या विकासासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
याबाबत शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी सांगितले की, तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राचा विकास करताना पुजारी बांधवांना विश्वासात घेणे तसेच शहरातील सर्व प्रभागांचा समतोल विकास होणे आवश्यक आहे. ही भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकपणे स्वीकारली आहे.