Marathi Sahitya Sammelan 2026 Pudhari
धाराशिव

Marathi Sahitya Sammelan 2026: ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार

Marathi Sahitya Sammelan 2026: धाराशिवमध्ये २९-३० मे रोजी सोहळा; ९०० साहित्यिकांचा सहभाग, साहित्यविश्वात उत्साह

पुढारी वृत्तसेवा

Marathi Sahitya Sammelan 2026: ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित या प्रतिष्ठित साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार असून, साहित्यविश्वात या घोषणेमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सुनेत्रा पवार यांना अधिकृत निमंत्रण दिलं. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन धाराशिव येथे आयोजित करण्यात आलं आहे. “लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरी” या नावाने उभारण्यात येणाऱ्या विशेष साहित्य परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे २९ आणि ३० मे २०२६ रोजी हे संमेलन पार पडणार आहे.

या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत भूषवणार आहेत. देशभरातून तब्बल ९०० साहित्यिक, कवी, लेखक, अभ्यासक आणि नवोदित साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे हे संमेलन मराठी साहित्यविश्वातील एक मोठं व्यासपीठ ठरणार आहे.

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाला मोठी परंपरा लाभली आहे. यापूर्वी या संमेलनाचं उद्घाटन अनेक दिग्गज व्यक्तींनी केलं आहे. त्यामध्ये पु. ल. देशपांडे, जावेद अख्तर, शिवाजी सावंत, शरद पवार आणि ना. धों. महानोर यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.

या वर्षीचं संमेलन नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच मराठी साहित्याच्या नव्या प्रवाहांवर चर्चा घडवून आणणार आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक, लोकसाहित्य, डिजिटल साहित्य आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर विविध परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.

धाराशिवमध्ये होणारं हे साहित्य संमेलन मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जात असून, राज्यभरातील साहित्यप्रेमींचं लक्ष आता या दोन दिवसीय सोहळ्याकडे लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT