तुळजापूर : येथे मराठा समाजबांधवांशी संवाद  pudhari photo
धाराशिव

Maratha reservation | नोंदी रद्द करण्याचे षडयंत्र सरकारने करू नये : मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणासाठी अंतिम लढाई लढणार असल्‍याचे केले स्‍पष्ट

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुकीचे काम केले असून, त्याचे फळ त्यांना भोगावे लागेल. आता होणारी लढाई ही आरक्षणासाठीची अखेरची लढाई आहे. त्यामुळे मराठा समाजाने गाफील न राहता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी तुळजापूर येथे केले.

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या श्री. जरांगे यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचा प्रारंभ करण्याचा संकल्प केला. यावेळी देवीच्या महाद्वारासमोर मराठा बांधवांशी संवाद साधताना त्यांनी मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणल्याचे पुरावे आपल्याकडे असून, वेळ आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा त्यांनी दिला.

नोंदी रद्द करण्याचे षड्यंत्र सरकारने करू नये. उपलब्ध नोंदीनुसार प्रत्येक पात्र मराठा बांधवाला प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, यापुढे पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने सर्व मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत आरक्षणाच्या लढ्याचा संदेश पोहोचवावा. भाजप व शिवसेनेतील मराठा तरुणांनीही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घ्यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

दरम्यान, विविध संघटनांच्या वतीने श्री. जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी तुळजापूर दुमदुमून गेले. पुजारी कुमार टोले यांनी त्यांची पूजा करून आरक्षणाच्या लढ्यासाठी आशीर्वाद दिला. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT