धाराशिव : नी बेझंट, सरोजिनी नायडू, नेली सेनगुप्ता, इंदिरा गांधी, सोनिया गांधी अशा पाच महिलांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. महिला आरक्षणासाठी राजकीय नौटंकी करणाऱ्या भाजपने मात्र अद्यापही एका महिलेला अध्यक्षपद दिलेले नाही. हे पाहता सध्याचे भाजपचे रडगाणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे लातूरचे खा. शिवाजी काळगे यांनी केली. बुधवारी शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. धीरज पाटील, डॉ. स्मिता शहापूरकर यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले होते, ते फेटाळले गेल्याने भाजपने विरोधी पक्षांना जबाबदार धरत देशभर आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फेही भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी खा. काळगे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, नरसिंह राव पंतप्रधान असताना काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वप्रथम महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. २०२३ मध्ये मोदी सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला बिनशर्त पाठिंबा देऊन ते विधेयक राज्यसभेतही मंजूर केले होते. पहिले विधेयक मंजूर झालेले असतानाही केवळ भाजपला राजकीय सोयीचे ठरेल अशा पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला जोडून महिला आरक्षण विधेयक आणणे ही निंदनीय बाब आहे.
यात राजकीय सोय पाहून भाजपने महिला आरक्षणाच्या आडून राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न केला. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारत तसेच पर्वतीय भागातील राज्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे भाजपचा हा राजकीय डाव काँग्रेसने उधळून लावला. सध्या अस्तित्वात असलेल्या ५४३ जागांवर ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याची गरज आहे. ते सोडून भाजप राजकीय रडगाणे गात असल्याची जोरदार टीका खा. काळगे यांनी केली.
महिलांचा सन्मानच'
खा. काळगे म्हणाले, की देश स्वतंत्र होण्याअगोदरपासून काँग्रेसने महिलांचा सन्मान केला आहे. पक्ष, संघटनेत त्यांना मानाची महत्त्वाची पदे दिली आहेत. तसेच भाजपमध्ये काहीच दिसत नाही. तरीही त्यांच्याकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. जनता हे सगळे जाणून आहे. त्यांच्या या दुष्प्रचाराला जनता बळी पडणार नाही.