कळंब : महाराष्ट्र कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या नवीन आकृतिबंधाला महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित आकृतिबंध रद्द करून अनुभवी अधिकारी, कर्मचारी व संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती गठित करून शेतकरीहिताचा व व्यवहार्य आकृतिबंध तयार करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रस्तावित आकृतिबंधामुळे कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हितावर तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषी विस्तार सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. बदलत्या कृषी क्षेत्राच्या गरजा, वाढती कामाची व्याप्ती आणि शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन लक्षात घेऊन नवीन आकृतिबंध तयार करावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कळंब येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रस्तावित आकृतिबंधाचा निषेध केला. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षकांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
महासंघाच्या आंदोलनाच्या नियोजनानुसार २५ ते २७ ऑगस्टदरम्यान काळ्या फिती लावून निषेध, २७ ऑगस्टला व्हॉट्सॲप समूहातून बाहेर पडणे, ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान लेखणीबंद आंदोलन, बैठकींवर बहिष्कार व रिपोर्टिंग बंद करण्यात येणार आहे. २ ते ३ सप्टेंबरदरम्यान सामूहिक रजा घेऊन जिल्हा व आयुक्तालय स्तरावर आंदोलन करण्यात येईल.
त्यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास ४ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी मारुती ओव्हाळ, मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा लोमटे, माधुरी चौगुले, उपकृषी अधिकारी उमेश पोतदार, संदीप अडसूळ यांच्यासह तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.