रत्नापूर : ग्रामीण भागात सध्या गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे पुन्हा एकदा पारंपरिक चूल पेटवण्याची वेळ महिलांवर आली आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून अनेक घरांमध्ये चुलीचा वापर बंद झाला होता. मात्र सध्याच्या गॅस टंचाईमुळे आडगळीला पडलेल्या या चुली पुन्हा वापरात येत असल्याचे चित्र गावखेड्यांत दिसून येत आहे. यामुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील अनेक तरुण महिलांना चूल कशी पेटवायची याचा अनुभव नाही. गॅसच्या वापरामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंपाकाची पद्धत बदलली होती. त्यामुळे अचानक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याने महिलांना धूर, लाकूड गोळा करणे, चूल पेटवणे यांसारख्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धुरामुळे आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार काही महिलांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील हायवेवरील हॉटेल चालकांनाही गॅस टंचाईचा मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेल चालकांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे चुली पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही गोष्टी वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गॅस सिलिंडर बुकिंगसाठी फोन केल्यास अनेक वेळा फोन लागत नाही, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
काही वेळा फोन लागल्यानंतरही “काही तांत्रिक कारणामुळे तुमचे गॅस बुकिंग होत नाही, क्षमस्व” असा संदेश मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून बुकिंग प्रलंबित राहिल्यामुळे घरगुती स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे चुलीसाठी लागणारे लाकूड आणि शेणाच्या गौऱ्यांची मागणीही वाढली आहे. मात्र अनेक ठिकाणी हे साहित्य सहज उपलब्ध होत नसल्याने महिलांना तसेच हॉटेल चालकांना ते मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. गॅस वितरण व्यवस्था सुधारून नागरिकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.