धाराशिव : लोकायत कल्चरचे उद्घाटन करताना डॉ. नागोराव कुंभार.शेजारी डॉ. स्मिता शहापूरकर, रमेश दापके आदी. pudhari photo
धाराशिव

Dharashiv News : लोकायत विचारधारेच्या मार्गानेच समाजाचा सर्वांगीण विकास : कुंभार

‌‘लोकायत कल्चर‌’चे धाराशिव येथे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : प्रत्यक्ष अनुभव, सत्य हेच प्रमाण सामाजिक समता, वेद प्रामाण्याला नकार आदी मूल्ये मानणाऱ्या लोकायत विचारधारेच्या मार्गानेच समाजाचा सर्वांगीण व समतोल विकास शक्य आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले.

लोकायत विचारधारेला प्रमाण मानून समाजातील प्रश्नांचा, संस्कृतीचा ज्ञान, माहिती व तंत्रज्ञानाआधारे अभ्यास, संशोधन व त्याद्वारे विकास करण्याचा निश्चय करणाऱ्या लोकायत कल्चर रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेचे उद्घाटन प्रा. कुंभार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश दापके होते. लोकप्रतिष्ठानच्या विश्वस्त डॉ. स्मिता शहापूरकर, अध्यक्ष सुरेखा जगदाळे, मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. कुंभार म्हणाले की, प्लेटो, सॉक्रेटिस, रिस्टॉटल, कांट, मार्क्स आदी तत्ववेत्त्यांनी प्रचंड ज्ञानाच्या आधारे अभ्यास व संशोधन करुन मानवी जीवन, जगणे सुंदर व आशयसंपन्न करण्यासाठी विशिष्ट असे तत्त्वज्ञान जन्माला घातले. सॉक्रेटीस तर चौकात उभे राहून येणार्या जाणार्या माणसांना कवेत घेऊन काय चांगले, काय वाईट हे सांगायचा. भारतातील अनेक महापुरुषांनीही भारतीय विचारधारेतून जन्माला आलेल्या विचारधारा व आधुनिक तत्त्वज्ञानांचा मेळ घालून भारतीय प्रागतिक विचार जन्माला घातला.

लोकायत हाही असाच सर्वसमावेशक, सत्य, अनुभव, स्वातंत्र्य, समता बंधुभाव मानणारा विचार. आज जगभर भांडवली, कट्टरवाद, संकुचितपणा, जांत्यंध व धर्मांध विचारसत्तांनी जग व्यापले आहे. आपल्या कडे तर इथल्या दांभिक व्यवस्थेने सर्वसामान्य बहुजन समाजाची विचार करण्याची क्षमताच दाबून टाकली आहे. विचार करणारी तत्त्वज्ञानी माणसे समाजाची ऐश्वर्य असतात. तो विचार आत्मसात करून आपले व समाजाचे जगणे मानवी व सुसह्य करण्यासाठी ज्ञान शक्तीसंपादन केली पाहिजे. त्यासाठी चिकाटी आवश्यक असते.

बहुजन आणि सामान्य वर्गातील माणूस विचार करत नाही, त्याची आकलन क्षमता वाढत नाही आज परिस्थिती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी लोकायत हाच विचार जपला गेला पाहिजे. लोकायत कल्चर रिसर्च डेव्हलपमेंट सेंटरने हे कार्य करावे. यावेळी प्रा. रमेश दापके, डॉ. स्मिता शहापूरकर यांची समयोचित भाषणे झाली. सेंटरची भूमिका लोकायतचे संचालक दयानंद माने यांनी प्रास्ताविकात मांडली. आभार व सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. कार्यक्रमास लोकायतचे संचालक सुनील बडूरकर, अरुण रेणके, सुदेश माळाळे, विजय गायकवाड, प्रवीण जगताप, हुंकार बनसोडे, नितीन माने आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT