धाराशिव

Dharashiv leopard news| भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली; वनविभागाचा सतर्कतेचा इशारा, शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याची माहिती समोर आली आहे

पुढारी वृत्तसेवा

भूम : तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. रामेश्वर शिवारात बिबट्यासदृश प्राण्याने शेळीला पकडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्यानंतर आता वारेवडगाव येथे गाईवर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली होती. ही घटना शेतकरी बाळासाहेब नलवडे यांच्या शेतात घडली असून हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी ७ वाजून १० सेकंदांनी वनविभाग व शेतकऱ्याच्यावतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब नलवडे यांच्या गाईला लक्ष्य करताना बिबट्या कॅमेऱ्यात दिसून आला आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाला तत्काळ कळविण्यात आले. वन अधिकारी कुटे, वनपाल जाधवर व जगताप देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाची टीम कार्यरत झाली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

या सलग घटनांमुळे भूम तालुक्यासह आसपासच्या गावांतील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वनविभागाकडून तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेर एकटे जाऊ नये, जनावरे सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी बांधावीत, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असा संदेश देण्यात आला आहे. “सतर्क रहा, सुरक्षित रहा,” असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT