भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : धाराशिव रेल्वे स्थानकावरील नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवासी शेडच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अगदी रिमझिम पावसातही शेडमधून गळती होत असून, पावसाचे पाणी थेट प्रवाशांच्या बाकड्यांवर पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमुळेच प्रवाशांची अडचण वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन शेड उभारले. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या शेडच्या गुणवत्तेची पोलखोल झाली आहे. शेडच्या अनेक ठिकाणांहून गळती होत असून, विशेष म्हणजे ज्या बाकड्यांवर प्रवासी बसतात त्याच ठिकाणी पाण्याच्या धारा पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उभे राहूनच रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
धाराशिव रेल्वे स्थानकावरून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, धनबाद, हैदराबाद आदी महत्त्वाच्या मार्गांवर रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. वाढत्या प्रवासी संख्येनुसार सुविधा उभारण्यात येत असल्या तरी त्या दर्जेदार नसल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात उभारण्यात आलेल्या सुविधांमध्येच त्रुटी दिसून येत आहेत. शेड उभारणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून शेडची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील सर्व सुविधांची तपासणी करून गळतीची समस्या त्वरित दूर करावी, अन्यथा प्रवाशांचा रोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अगदी बारीक पाऊस सुरु होता. तरी शेडमधून थेट बाकड्यांवर गळती सुरु होती. त्यामुळे प्रवाशांना बाकड्यांवर बसता येत नव्हते. त्यात भर म्हणजे नागपूर ते कोल्हापूर रेल्वे रविवारी तीन तास उशिराने धावत होती. परिणामी अनेक प्रवाशांना जमिनीवर बसावे लागले तर अनेकांना ताटकळत थांबावे लागले. हा प्रकार चुकीचा आहे.सुशिला मोहिते, प्रवासी.