Crime News
वाशी : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीने आपल्या मावसदिराच्या मदतीने चाकूने वार करून व दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी भूम तालुक्यातील कुंथलगिरीच्या डोंगरात घडली. वाशी पोलिसांनी सतर्कता दाखवत पाठलाग करून संशयित शुभम खोसे व अंजली कागदे यांना अवघ्या काही तासांतच जेरबंद केले.
वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील गोविंद शिवाजी कागदे (वय २७) यांचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तांदूळवाडी येथील बाळासाहेब चौधरी यांची मुलगी अंजली हिच्याशी झाला होता. मात्र अंजलीचे गोविंदचा सख्खा मावस भाऊ शुभम सुभाष खोसे (रा. चांदवड) याच्यासोबत आधीपासूनच प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधांमध्ये पती गोविंदचा अडसर ठरत असल्याने त्याला कायमचे संपवण्याचा कट रचण्यात आला.
१९ नोव्हेंबर रोजी दुपारी गोविंदला कुंथलगिरी घाटातील डोंगरात बोलावून घेण्यात आले. दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास निर्जन डोंगरात नेऊन चाकूने वार आणि दगडाने ठेचून गोविंदची निर्घूण हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह डोंगराच्या उताराला खोदलेल्या चारीत फेकून देण्यात आला.
ही सर्व घटना डोंगराच्या दुसऱ्या कडेला आसलेल्या गुराख्याने पाहिली त्याने तात्काळ मारकड पोलिसांना घडलेली घटना सांगितली. त्याने वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे याबाबत माहिती दिली. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोविंद याला ठार मारून डोंगरातून पळून जात आसलेल्या शुभम व अंजली यांचा पाठलाग करत पोलिसांनी त्यांना पकडले.
पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस व्हि जराड, हावलदार कपील बोरकर, बाळासाहेब आवताडे, विठ्ठल मलंगनेर, सय्यद, पवार हे करत आहेत.