Heavy Rain 
धाराशिव

Heavy Rain | कळंब तालुक्यात पावसाचे तांडव! पिकांचा चिखल, डोळ्यांत अश्रू! पुराच्या पाण्यात एकाचा मृत्यू; अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain | शनिवारी मध्यरात्रीनंतर कळंब तालुक्यात पावसाने अक्षरशः तांडव माजवले. रात्रभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार उडाला असून, शेतातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Kalamb Taluka Heavy Rain

शनिवारी मध्यरात्रीनंतर कळंब तालुक्यात पावसाने अक्षरशः तांडव माजवले. रात्रभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार उडाला असून, शेतातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत पाडोळी येथील एक शेतकरी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले असून, दोघांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात शोक आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचा चिखल झाला असून, आता उत्पन्न हातात येण्याची २० टक्के अपेक्षाही मावळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.

जीवितहानी आणि बचावाची थरार कथा

तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना महापूर आला. याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एक दुर्दैवी घटना घडली. पाडोळी येथील शेतकरी विजय जोशी यांचे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुःखद निधन झाले आहे. पावसामुळे शेतात गेलेले शेतकरी शेतातच अडकले होते.

दुसरीकडे, ईटकूर येथील वाशिरा नदी ओलांडत असताना दोन शेतकरी वाहून जात होते. मात्र, स्थानिकांच्या मदतीने त्यांना बालंबाल वाचवण्यात यश आले आहे.

पिकांचे अतोनात नुकसान आणि संपर्क तुटलेली गावे

या अतिवृष्टीचा परिणाम तालुक्याच्या दळणवळणावरही झाला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भोगजी, आढाळा, पिंपळगाव को आदी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ईटकूर येथून पुढील गावे, जसे की गंभिर वाडी, यांचा संपर्क तुटला. त्याचप्रमाणे खामसवाडी, वडगाव शि, निपाणी, संजितपूर, बाभळगाव आणि दहीफळ यांसारख्या अनेक गावांचाही संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांना आता या पावसाळ्यातील वीस टक्के उत्पन्नही हातात येईल अशी जी थोडीफार आशा होती, तीही पूर्णपणे मावळली आहे.

शेतकऱ्यांची व्यथा आणि राजकीय मागणी

न भरून येणारे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता उपजीविका कशी करायची? असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. एका बाजूला मदतीची गरज असताना, दुसऱ्या बाजूला महसूल विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी, काही गावांमध्ये तलाठी हे शेतकऱ्यांची अवहेलना करत आहेत. तलाठी नियमांचे बोट दाखवून सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. 'तलाठ्यांचा तोरा, शेतकरी मारा' अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची तात्काळ मदतीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे.

"तालुक्यातील सर्वच पिके उध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कसलेही पंचनामे न करता, थेट सातबारावरील नावावर आधारित मदत तात्काळ द्यावी," अशी मागणी सुरेश गायकवाड यांनी केली आहे.

एकंदरीत, कळंब तालुक्यात या अतिवृष्टीमुळे मोठी नैसर्गिक आणि मानवी आपत्ती कोसळली आहे. शासन आणि प्रशासनाकडून तातडीने मदत मिळाल्यासच शेतकऱ्यांना या संकटातून सावरणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT