३५ लाखांचा पूल 'कागदावरच मजबूत'? file photo
धाराशिव

३५ लाखांचा पूल 'कागदावरच मजबूत'?

आष्टीत सुमार कामांचा ग्रामस्थांनी केला भंडाफोड; मार्च एंडिंगच्या नावाखाली अधिकारी टक्केवारीत धुंद

पुढारी वृत्तसेवा

Is the ₹35-Lakh Bridge 'Strong Only on Paper'?

कडा, पुढारी वृत्तसेवाः आष्टी तालुक्यातील सालेवडगाव ते गणेशवाडी रस्त्यावरील नदीवर उभारण्यात येणाऱ्या ३५ लाख रुपयांच्या नळकांडी पुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा 'सिमेंट' कालवला गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याच्या गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनसुब्यावर जागृत ग्रामस्थांनी पाणी फेरले असून, आक्रमक पवित्रा घेत हे निकृष्ट काम घटनास्थळीच बंद पाडले. वाढता जनक्षोभपाहून अखेर प्रशासनाला जेसीबी लावून स्वतः च केलेले निकृष्ट काम पाडण्याची नामुष्की ओढवली.

'मार्च एंडिंग'चा घोळ आणि बोगस बिले ! मार्च महिना संपत असताना प्रशासकीय वर्तुळात केवळ निधी खर्च पडल्याचे दाखवण्यासाठी बोगस कामांचा धडाका लावला जातो. सालेवडगाव येथेही हाच प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ३५ लाखांच्या या पुलाचे काम अवघ्या २-३ लाखात उरकून उर्वरित निधी अधिकारी आणि गुत्तेदारांच्या खिशात घालण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

अनेक ठिकाणी तर केवळ कागदावर कामे दाखवून, कामाच्या ठिकाणी एक वीटही न रचता टक्केवारीच्या जोरावर बिले लाटण्याचे 'अर्थपूर्ण' व्यवहार जिल्ह्यात सुरू आहेत की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सोमवारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने पुलावर जमा झाले आणि त्यांनी कामाचा सुमार दर्जा पाहून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आष्टी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला, तेव्हा त्यांची बोलती पूर्णपणे बंद झाली होती. अखेर हे निकृष्ट बांधकाम पाडून नव्याने गुण-वत्तापूर्ण काम करण्याचे लेखी आश्वासन आणि संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे इंजिनिअर सुनील राठोड यांनी कबूल केल्यावरच ग्रामस्थ शांत झाले. सखोल चौकशीची गरज शालेय मुले आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा भ्रष्ट साखळीवर जिल्हास्तरावरून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

केवळ काम पाडून पुन्हा करणे पुरेसे नसून, मार्च एंडच्या नावाखाली 'टक्केवारी' घेऊन बोगस कामांना मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सालेवडगाव व गणेशवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT