School Pudhari
धाराशिव

इंग्रजी शाळांना वठणीवर आणणार कोण?

मनमानी दराने पुस्तक विक्री; पालकांची आर्थिक पिळवणूक

पुढारी वृत्तसेवा

शंकर बिराजदार

उमरगा : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांकडून वह्या-पुस्तकांची छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून या प्रकारामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ १२ ते १५ पुस्तकांच्या संचासाठी हजारो रुपयांची आकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे. या शाळांना वठणीवर आणणार कोण, असा सवाल विचारला जात आहे.

शहरातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात. मात्र काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे पालकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके ठराविक खाजगी पुरवठादाराकडून छापून घेऊन ती केवळ शाळेतच विकली जात आहेत. त्यामुळे पालकांसमोर पर्यायच उरत नाही.

या पुस्तकांच्या मूळ छापील किमतीवर स्टिकर लावून वाढीव दर आकारला जात आहे. तसेच काही ठिकाणी बिलांमध्ये पारदर्शकता नसून वह्या-पुस्तकांसोबत अनावश्यक साहित्य घेण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कोणतीही सवलत न देता ‘मकेदारी’ पद्धतीने ही विक्री सुरू असून यात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकारामागे शाळेतील जबाबदार व्यक्तींचा हात असल्याची चर्चा पालकांमध्ये रंगली आहे. पालकांची अडवणूक होत असतानाही शिक्षण विभाग या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तीव्र झाला आहे.

तक्रारी असूनही ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल पालक विचारत आहेत. काही पुस्तके, शैक्षणिक तसेच अनावश्यक साहित्य केवळ शाळेतूनच खरेदी आणि सर्व व्यवहार रोखीने करण्याची सक्ती केली जात आहे. छापील किमतीवर स्टिकर लावून वाढीव दर आकारले जात आहेत. एवढ्यावरच न थांबता, फी थकीत असल्यास विद्यार्थ्यांना निकाल व उत्तरपत्रिका दाखवण्यास सरळ नकार दिला जात आहे. ‘

आधी फी भरा, मगच निकाल’ अशी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शिक्षण हक्काच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
- एक पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT