तुळजापूर : बेकायदेशीर देहविक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करताना नगरसेविका प्रियंका गंगणे. या वेळी विजय गंगणे उपस्थित होते.  pudhari photo
धाराशिव

Illegal prostitution in Tuljapur : बेकायदेशीर देहविक्री विरोधात कारवाई करा

अन्यथा तुळजापूर शहरात आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजापूर नगरीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांनी केला आहे. या प्रकारावर तत्काळ कारवाई न झाल्यास महिलांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तुळजापूर पोलिस स्टेशन हद्दीतील नवीन बसस्थानकाजवळील गोपाळनगर परिसरात अवैध कुंटणखाने व देहविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगरसेविका गंगणे यांनी पोलिस अधीक्षक तसेच तुळजापूर पोलिस निरीक्षकांना लेखी तक्रार देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही टवाळखोर प्रवृत्तीचे पुरुष महिलांशी आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र नगरीत असे प्रकार सुरू राहणे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी संबंधित लॉज मालकांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर गोपाळनगर परिसरातील महिलांच्या वतीने तुळजापूर पोलिस स्टेशनवर लोकशाही मार्गाने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे

या निवेदनावर प्रियंका गंगणे, सपना जयकुमार पांढरे, सुनीता कावरे, कविता शेंडगे, आरती पांढरे, कमल नागनाथ पांढरे यांसह नागरिक उपस्थित होते.

नागरिकांची होतेय कुचंबणा

सायंकाळच्या वेळी संबंधित परिसरातील काही लॉजिंग तसेच हमरस्त्यावर हा अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती शहरवासीयांना असल्याचे सांगण्यात येते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT