उमरगा : शहरातील एका कॅफे सेंटरजवळ कारमध्ये अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चारचाकी वाहनासह एक गावठी पिस्तूल, चार जीवंत काडतुसे, चार कोयते, एक सुरी, असा २ लाख ७८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुशील शहापूरे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा सुगावा लागताच त्याचे चार साथीदार पळून गेले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील एका महाविद्यालयासमोरील कॅफे सेंटरमध्ये आलेल्या व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक शेलार यांनी एक पथक तयार करून याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचला असता सुशील शहापूरे हा कॅकेतून कारजवळ येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी करत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे पिस्तूल व चार जीवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर त्यांच्या कारची पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये सहा कोयते व एक सुरा आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडील २ लाख ७८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने, पोहेकॉ संतोष बोयणे, संतोष सोनवणे, पोलीस नाईक महेश अवचार, पोकॉ शिवराज थोरे, अनंत कांबळे, बालाजी जाधव यांच्या पथकाने केली.
कॅफे सेंटरवर सुशील हा चार जणासोबत वाढदिवसासाठी आला होता. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुशील अडकला. दरम्यान पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्याच्या सोबतचे चारजण कॅफे सेंटरवरून उड्या मारुन पसार झाले. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.