उमरगा, पुढारी वृत्तसेवा : धाराशिवच्या नारंगवाडी येथील समाजकंटकाने औरंगजेबाचे स्टेट्स मोबाईलवर ठेवल्याने आज (दि २०) हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत टायर जाळून उमरगा - लातूर राज्यमार्ग तब्बल चार तास रोखून धरला. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Dharashiv Protest)
याबाबतची माहिती अशी की, नारंगवाडी गावातील एका समाजकंटकाने औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत उमरगा- लातूर राज्यमार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. त्यानंतर नारंग वाडी पाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज कंटकावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी उमरगा - लातूर राज्यमार्गावर ठिय्या मांडला. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी समाज कंटकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक आरोपी अटकेच्या मागणीवर ठाम होते. पोलिसांनी संबंधित तरुणाचा तत्काळ शोध घेत ताब्यात घेतले. त्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले. तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत सुरू झाली. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. संबंधित तरूण हा अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे.
नागपुरात एकीकडे दगडफेक जाळपोळीची घटना ताजी असतानाच नारंगवाडी येथील एका समाजकंटकांनी र्औरंगजेबाचे स्टेट्स मोबाईल व इस्न्टाचा रिल्स वर ठेवल्याने शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनां आक्रमक झाल्या होत्या. पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संबंधित तरूणाने सर्वांची माफी मागितली. त्यानंतर पोलीस आरोपीला घेऊन गेले.
दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा आक्षेपार्ह फोटो व पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे फोटो किंवा मजकूर कोणी पोस्ट केले. तर याची पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. जातीय सलोखा अबाधित ठेवावा, विध्वंसक प्रकार करून कायदा हाती घेऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, जे कोणी सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.- अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक, उमरगा